Ad will apear here
Next
नवाजुद्दीन सिद्दीकी, शंभू मित्रा


अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा १९ मे हा जन्मदिन. तसेच, बंगाली रंगभूमीवरील प्रथितयश अभिनेते, दिग्दर्शक आणि नाटककार शंभू मित्रा यांचा १९ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........... 
नवाजुद्दीन सिद्दीकी
१९ मे १९७४ रोजी नवाजुद्दीन सिद्दीकीचा जन्म झाला. नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या बॉलिवूडमधील व्यग्र अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्युनियर आर्टिस्टपासून एक यशस्वी अभिनेता बनण्यासाठी त्याला अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता. चाहत्यांच्या मनात घर करायचं असेल, तर सुंदर चेहऱ्यापेक्षा उत्तम अभिनयाचं कसबही अंगी असावं लागतं हे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने दाखवून दिलं. 

उंच, गोरा वर्ण, सुंदर दिसणं, अशा ‘हिरो’च्या ज्या व्याख्या आहेत, त्यांना छेद देऊन नवाजुद्दीन आता लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत जाऊन पोहोचला. एक छोटा कलाकार ते सुपरस्टार हा त्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आपल्या उमेदीच्या काळात कोथींबीर विकण्यापासून पै न् पैसाठी झगडा अशा अनेक वाईट काळाचा साक्षीदार तो होता. 

नवाजुद्दीने एका मुलाखतीत सांगितले होते, ‘माझे वडील शेतकरी होते. आई-वडील, सात भाऊ आणि दोन बहिणी असे आमचे कुटुंब. वडिलांची इच्छा होती, की खूप शिकावे. हलाखीच्या परिस्थितीत हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी युनिव्हर्सिटीतून मी विज्ञान शाखेत ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षणानंतर नोकरी मिळत नव्हती. दोन वर्षे नोकरी शोधण्यात गेली. पुढे बडोद्याच्या पेट्रोलियम कंपनीत दीड वर्षे नोकरी केली. ती नोकरी धोकादायक होती. अनेक प्रकारच्या केमिकलचे टेस्टिंग करावे लागायचे. नंतर ती नोकरी सोडली आणि दिल्लीत आलो. येथे पुन्हा नोकरीचा शोध घेतला. काम मिळाले नाही. एके दिवशी एका मित्रासोबत एक नाटक बघायला गेलो. ते नाटक बघून अतिशय आनंद वाटला. त्यानंतर अनेक नाटकं पाहिली. हळूहळू रंगभूमीविषयी जवळीक निर्माण झाली. मग मी साक्षी नावाचा एक ग्रुप जॉइन केला; मात्र थिएटरमध्ये पैसे मिळत नाहीत. रोजचा उदरनिर्वाह चालवणेसुद्धा शक्य होत नाही. एक वेळच्या जेवणाची तरी सोय व्हावी म्हणून मी वॉचमनची नोकरी स्वीकारली.’

नवाजुद्दीनने १९९९ साली आलेल्या ‘सरफरोश’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘बजरंगी भाईजान’ यांसारख्या सिनेमांमध्ये तो झळकला. कहानी, जंगल, मॉम, सेक्रेड गेम्स, रामन राघव, तलाश हे त्यांचे इतर चित्रपट. ‘तलाश’ या चित्रपटातील अपराधी तैमूर या भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला ६०व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारात ज्युरी स्पेशल पुरस्कार मिळाला होता. 

‘रामन राघव’ चित्रपट कान फिल्म महोत्सवामध्ये दाखवला गेला होता. फाळणीनंतर मुंबईतून लाहोरला गेलेले लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेता नवाजुद्दीनने मुख्य भूमिका केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीनने बाळासाहेबांची भूमिका केली होती. नवाजुद्दीनच्या ‘धूमकेतू’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. त्यामुळे नवाज सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित तीन  या चित्रपटाविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘रामन राघव २.०’  या चित्रपटाविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


....


शंभू मित्रा
२२ ऑगस्ट १९१५ रोजी कोलकात्यात शंभू मित्रांचा जन्म झाला. ते भारतीय नवनाट्याचे अध्वर्यू म्हणून ओळखले जातात. बंगाली रंगभूमीवरील प्रथितयश व प्रतिभावंत नट, दिग्दर्शक आणि नाटककार अशी त्यांची ओळख.

त्यांचे शालेय शिक्षण कोलकाता येथील बालीगंज गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षणाची सुरुवात सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झाली; पण शिक्षणात फारसा रस न वाटल्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आणि खासगीरीत्या वाचन वाढवून स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतः घडविले. १९३९ साली ते बंगाली रंगभूमीवर आले. प्रथम त्यांनी कोलकात्यातील अनेक व्यावसायिक नाटकमंडळाबरोबर कामे केली. शिशिर भादुडी यांच्या अतिशय नावाजलेल्या नाटक कंपनीतही शंभू मित्रा यांनी अभिनय केला होता.

पुढे १९४३ साली मात्र त्यांनी व्यावसायिक रंगभूमी सोडली व ते ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’चे (आयपीटीए) सदस्य झाले. बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळावर ‘नवान्न’ नावाचे नाटक त्यांनी लिहिले. या नाटकाने तत्कालीन नाट्यजगतात एक नवेच चैतन्य आणले. १९४६ साली त्यांनी ‘आयपीटीए’मधूनही आपले अंग काढून घेतले व स्वतःचा स्वतंत्र नाट्यसंच स्थापन केला. त्यालाच १९४८ साली ‘बहुरूपी’ असे नाव देण्यात आले होते. महर्षी मनोरंजन भट्टाचार्य हे या ‘बहुरूपी’ संस्थेचे अध्यक्ष होते. 

शंभू मित्रा यांची अभिनयासाठी व दिग्दर्शनासाठी गाजलेली काही नाटके अशी : रक्तकरबी (रवींद्रनाथ टागोर), दशचक्र (इब्सेन यांच्या ‘ॲन एनिमी ऑफ दी पीपल’चे बंगाली रूपांतर), पुतुल खेला (इब्सेन यांच्या डॉल्स हाउसचे बंगाली रूपांतर), विसर्जन (रवींद्रनाथ टागोर), राजा (रवींद्रनाथ टागोर), राजा ओयदिपाऊस (सोफोक्लीस यांच्या एडिपस रेक्स या नाटकाचे बंगाली भाषांतर), बाकी इतिहास (बादल सरकार), पागल घोडा (बादल सरकार) इत्यादी. 

शंभू मित्रा यांनी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले असून त्यांच्या जागते रहो या हिंदी चित्रपटाला १९५६ साली कारलॉवी व्हारी या महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान लाभला होता. तसेच नाट्यदिग्दर्शक म्हणून १९५९ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९७० साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरविण्यात आले होते. १९७६ साली त्यांना ‘मॅगसेसे अवॉर्ड’ मिळाले होते. त्याचप्रमाणे १९८२मध्ये त्यांना मध्य प्रदेश शासनाचा ‘कालिदास सन्मान’ देऊन गौरविण्यात आले होते. 

काही वर्षे रवींद्र भारती विद्यापीठाच्या नाट्यविभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम सांभाळले होते. जर्मन दिग्दर्शक फ्रिट्स बेनेव्हिट्झ यांच्या दिग्दर्शनाखाली शंभू मित्रा यांनी गॅलिलिओ जीवनी (ब्रेक्ट यांच्या गॅलिलिओचे बंगाली भाषांतर) या नाटकात केलेली गॅलिलिओची भूमिका म्हणजे त्यांच्या चिरनूतन अभिनयगुणांची साक्ष आहे. नाट्याभ्यासाच्या निमित्ताने शंभू मित्रा यांनी अमेरिका, रशिया, युगोस्लाव्हिया, चेकोस्लोव्हाकिया, पोलंड, जर्मनी व कॅनडा इ. ठिकाणी प्रवास केला होता. 
शंभू मित्रा यांची काही प्रकाशित पुस्तके अशी : अभिनय-नाटक–मंच (१९५७), पुतुल खेला (१९५८), कांचनरंग (१९६१),धुरणी(१९६७), राजा ओयदिपाऊस (१९६९), प्रसंग नाट्य (१९७२) इत्यादी. 

शंभू मित्रा यांच्या पत्नी तृप्ती मित्रा या दिग्गज बंगाली नाट्यकलावंत. तृप्ती मित्रांनी बंगाली ‘शांतता..’ मधील ‘बेणारेबाई’ साकार केली होती. तसेच त्यांच्या कन्या सावली मित्राही बंगाली रंगभूमीवरील प्रथितयश अभिनेत्री आहेत. शंभू मित्रा यांचे १९ मे १९९७ रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZRHCM
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
कुटुंब दिनानिमित्त दोन कविता : ‘ते माझे घर’ आणि ‘घर असावे घरासारखे’.. १५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या परिस्थितीत कुटुंबाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, घर म्हणजेच कुटुंब ही संकल्पना नेमकेपणाने उलगडून सांगणाऱ्या दोन कविता प्रसिद्ध करत आहोत. श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची ‘ते माझे घर’ आणि विमल लिमये यांची ‘घर असावे
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ५) ‘आपल्या प्राचीन परंपरेत विज्ञान होतं आणि ते घराघरापर्यंत गेलेलं होतं. घराशी विद्यापीठ जोडलेलं होतं. आता विद्यापीठात जाऊन शिकावं लागतं. मग लक्षात आलं, की इथे आपण ‘मेकॉले’ घेऊन चाललोय. आपण हे शिक्षण देणार आणि जाणार, त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याच्यात आपण आधुनिकतेची भर घालावी आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language